Home » How to preserve Marathi? | मराठी भाषा मरत आहे का? उपाययोजना काय? वाचा!
marathi, fort, Shivaji Maharaj

How to preserve Marathi? | मराठी भाषा मरत आहे का? उपाययोजना काय? वाचा!

Reading Time: 10 minutes

गांभीर्य लक्षात आणून देणाऱ्या काही गोष्टी!

तुम्हाला एक घटना सांगतो,

कल्पना करा की, २१०० साल सुरु आहे. लांब नाही, बरं का! आजपासून फक्त ८० वर्षांपुढची गोष्ट करतोय. आता २१०० मध्ये मराठी शाळा गेल्या २०-३० वर्षांत नामशेष होऊन गेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर इंग्रजी माध्यमाच्याच शाळा आहेत. भारताचं सोडा अख्या महाराष्ट्रभर ज्या १० मराठी शाळा सुरु होत्या, त्यासुद्धा गेल्या ५-६ वर्षांत बंद पडल्या असून मराठी शाळांचं अस्तित्वच पूर्णतः नामशेष झालेलं आहे. भारताची लोकसंख्या आता १९० कोटींवर पोहचली आहे. त्यात मातृभाषा मराठी असणाऱ्या लोकांची लोकसंख्या २७ कोटी झालीये. पैकी ७० टक्के लोकं पूर्णतः मराठीतून न बोलता मराठी – हिंदी – इंग्रजी अशा मिश्रित भाषेतून एकमेकांसोबत संवाद साधत आहेत. (त्यांना पूर्ण मराठी अजिबातच येत नाही) तर, उरलेल्या ३० टक्के लोकांना मराठी येते. असं ते स्वतः म्हणत आहेत!

# मराठी बाबत समस्या? समजून घेऊया!

०१) मराठीत बोलता येतं पण, वाचता येत नाही!

०२) मराठी वाचता येतं पण, व्यवस्थित बोलता येत नाही!

०३) समोरच्याचं मराठी समजतं परंतू, वाचता व बोलता येत नाही!

०४) मराठी समजतं, बोलताही येतं परंतु, लिहिता येत नाही!

५) मराठी वाचता येतं, लिहिताही येतं, समोरच्यानं बोललेलं समजतंही परंतु, व्यवस्थित बोलता येत नाही!

# मराठीची गळचेपी!?

कळतंय का? मी काल्पनिक गोष्टी करत नाहीये…. मी हे सुद्धा म्हणत नाहीये की, हे असं भविष्यात होऊ वगैरे शकतं!

मी हे म्हणतोय की, “हे होणारच आहे” आणि हा लेख वाचणारे बऱ्याच अंशी वाचक माझ्या या विधानासोबत सहमत असतीलच. हे मी ठामपणे सांगू शकतो. म्हणजे, २०२० मध्ये महाराष्ट्रातंच मराठी भाषेची गळचेपी होत आहे हे सत्य तुम्हाला मान्य आहे का?

मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात अन् हृदयात अस्मिता निर्माण झालीच पाहिजे. तर आणि तरंच मराठी भाषा टिकून राहील.

# येणाऱ्या दिवसांत मराठी भाषेचं महत्त्व कमी होईल!?

आता तुम्ही म्हणाल की, “हा काहीही…… २१००  पर्यंत का बरं मराठीचा ऱ्हास होत जाईल? किंवा का बरं मराठी भाषेचं महत्व कमी होत जाईल?”

एक उदाहरण देतो, तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये १३-१४ वर्षांची मुलं असतीलच. जी लहानपणापासून पूर्णतः इंग्रजी माध्यमातून शाळा शिकत आली आहेत. तुम्ही त्यांचं निरीक्षण कधी केलं आहे? बहुसंख्य (मी बहुसंख्य म्हणतोय सरसकट सगळेच नाही) तर, या बहुसंख्य मुलांना मराठीतले साधे आकडेसुद्धा कळत नाही. त्यांना साडेतीनशे सांगता येत नाही तर, Three Fifty सांगावं लागतंय. त्या मुलांना मराठीतून घड्याळाचे काटेही कळत नाहीत. पाच वाजले म्हणजे, किती? तर, Five o’ clock असं इंग्रजीमधून सांगावं लागतं. अहो साध्या सोप्या मराठी शब्दांचा अर्थही समजत नाही त्यांना! २०२० मध्येच मराठीची ही अवस्था आहे तर, २१०० पर्यंत ही अवस्था आणखीनच बिकट होत जाईल हे नक्की!

# तुम्ही खरंच मराठी आहात?

आज महाराष्ट्रासह जगभरात मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांची लोकसंख्या तब्बल ११ कोटी आहे. ११ कोटी ही मोठी संख्या आहे.

जगभर जवळजवळ १९५ देश आहेत. त्यापैकी तब्बल १८४ देशांची प्रत्येकी लोकसंख्या ही ११ कोटी पेक्षाही कमी आहे. म्हणजेच, फक्त मराठी मातृभाषा असलेल्या लोकांचा एक स्वतंत्र देश बनवल्यास तो जगभरातील १९५ देशांपैकी बाराव्या नंबरवर येईल. त्याचप्रमाणे जगभर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये  मराठीचा क्रमांक पंधरावा येतो. यावरूनच आपल्या लक्षात येईल की, मराठीची महती ही प्रचंड आणि अवाढव्य आहे. आपल्या मराठी लोकांनाच त्याची अजिबात कल्पना नाहीये.

# मराठीसाठी झगडावं लागतंय?

आश्चर्य म्हणजे, महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आज झगडावे लागत आहे. आता तुम्ही म्हणाल की, कसे ब्वॉ? कुठं झगडावं लागतंय? आम्हाला तर नाही आला हा अनुभव! काही उदाहरणं आपण बघुयात –

०१) मराठी चित्रपटांना आपल्याच महाराष्ट्रात ना Prime time मिळत ना चित्रपटगृहे! इथं पूर्ण कब्जा घेतलाय तो हिंदी- इंग्रजी चित्रपटांनी. ज्यामुळे, मराठी चित्रपट निर्मात्यांना भरपूर नुकसान सोसावं लागतंय. परिणामी, त्यांची चित्रपट निर्मितीबाबतची आस्था हळू हळू कमी होत चालली आहे. आपल्याच मराठी मातीत, मराठी चित्रपटांना स्थान न मिळणं! यापेक्षा आणखी वाईट काय होऊ शकतं?
०२) नुकतंच एक ज्वलंत उदाहरण घडलंय. मराठीतुन बोलण्याची विनंती केली म्हणून, शोभा देशपांडे या लेखिकेला एका सराफानं दुकानाच्या बाहेर काढले. त्यासाठी त्या ६० वर्षांच्या लेखिकेला तब्बल ११ तास अन्नत्याग आंदोलन करावं लागलं.
०३) रेल्वे स्टेशनवर मराठी भाषेतून घोषणा होण्यासाठी आणि दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी इथं चक्क आंदोलन करावं लागतंय. ही आंदोलन करण्यासारखी गोष्ट आहे असं वाटतं का तुम्हाला? ज्या गोष्टीवर हक्क आहे त्या गोष्टीसाठीच आंदोलन करावं लागतंय यापेक्षा दुर्दैवी असं काय असू शकतं?

# मराठीचे सौंदर्य!

भाषेचे सौंदर्य हे आपल्या मातृभाषेतच सापडतं आणि ते सौंदर्य आपल्या मातृभाषेतच उमजतं. ते सापडण्यासाठी  इतर भाषा धुंडाळण्याची गरज नाहीये.

खालील कवितेच्या २ ओळी वाचा –

ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता ,

मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता

                                          -कवी ग्रेस

वाह….! काय ओळी आहेत या. जो मराठी आहे (आहे याचा अर्थ, लिहिता, वाचता, बोलता येणं) त्यालाच या ओळींतील सौंदर्य समजेल आणि तोच याचा आस्वाद घेऊ शकेल.

आता समजा, एखाद्या २५ वर्षीय मुलाची मातृभाषा मराठी आहे. परंतु, संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून पुर्ण झाले असल्यामुळे, त्याचप्रमाणे जॉब आणि त्याच्या आयुष्यात आतापर्यंत बहुतेक वेळ हे हिंदी – इंग्रजी मधून बोलणारे सवंगडी, शेजारी, ऑफिस सहकारी भेटल्यामुळे त्याला मराठीचा गंधही नसणार. त्याला मराठी वाचता, बोलता, लिहिता अगदीच तोडकं मोडकं येत असल्यामुळे आणि वरील कवितेतील शब्दांचा अर्थ कळत नसल्यामुळे त्या ओळी समजणार नाहीत. त्यामुळे तो त्या कवितेचा आस्वादच घेऊ शकणार नाही.

प्रश्न फक्त दोन ओळींचा नसून त्याचा थेट परिणाम येणाऱ्या कलाकृतींवर होणार आहे.

उदाहरणार्थ – मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठी साहित्य, मराठी गीतं, मराठी वर्तमानपत्रं, टेलिव्हिजनवरील सरसकट सगळ्याच मराठी वाहिन्या या साऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे आणि हा त्या एकट्या २५ वर्षीय मुलाचा प्रश्न राहिलेला नाही. तर, त्याच्याप्रमाणे अशा असंख्य मराठी माणसांचा प्रश्न होणार आहे, जे मराठीचा गंध विसरत चालले आहेत. जरी आताची पिढी नसली परंतु, ५०-१०० वर्षानंतरच्या पिढीच्या बाबतीत हे होणारच आहे. 

# मराठी अनुभव जेव्हा बोलतो!

माझ्या शेजारी भाऊ जोशी नावाचे गृहस्थ राहायला आहेत. ते नेव्हीमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. नोकरीच्या निमित्तानं त्यांना जगभर फिरण्याची संधी लाभली होती. त्या अनुभवांवरून ते गमतीनं म्हणतात,

“मी १२ गावचं नाही तर, १२ देशांचं पाणी प्यायलो आहे.”

त्यात, अख्या युरोपातील बहुतेक देश म्हणजेच, फ्रांस, स्वीडन, इटली, जर्मनी, नेदरलँड, स्पेन, ऑस्ट्रिया, नॉर्वे ते रशिया, आफ्रिका, पूर्वेकडे जपान, दक्षिण कोरिया या देशांबाबत त्यांचा अनुभव असा होता की, या बारा देशांमध्ये  त्या त्या देशांनी स्वतःच्या भाषेतच व्यवहार करून व स्वतःच्या भाषेचाच प्रचार-प्रसार करून स्वतःच्या मातृभाषेचा सन्मान केलाय आणि हो सर्वांत महत्वाचं म्हणजे, त्यांनी स्वतःच्या भाषेची अस्मिता जपली आहे.

तिथल्या देशातील लोकं एकमेकांसोबत स्वतःच्याच मातृभाषेमध्ये संवाद साधत होते. त्यांनी इंग्रजीला स्वतःच्या मातृभाषेपेक्षा वरचढ होऊच दिलं नाही. त्या सगळ्या देशांमध्ये आपल्या भारताप्रमाणे कुठेही इंग्रजी भाषेचा भडीमार नव्हता आणि सर्वात महत्वाचं त्यांना स्वतःच्या मातृभाषेबद्दल नितांत अभिमान व गर्व होता.

# मराठी होतेय मिश्रित मराठी!?

महाराष्ट्रात आजची पिढी ही मराठी-हिंदी-इंग्रजी मिश्रित भाषा बोलतेय. या तिन्ही भाषांची भेळ त्यांनी बनवून घातली आहे. ज्याची चव अर्थातच खूपच वाह्यात आहे. यामुळे झालं असं की, आताच्या तरुण पिढीचं ना मराठीवर प्रभुत्व आहे, ना हिंदी-इंग्रजीवर! दुर्दैव म्हणजे, याची त्यांना जाणीवही नाही! मी माझ्या बऱ्याच मराठी मित्र- मैत्रिणींच्या घरात बघितलं आहे की, घरातल्या घरातच आईवडील आणि मुलं एकमेकांसोबत हिंदी-इंग्रजीमध्ये बोलतात. मातृभाषा मराठीला नाकारण्याचं कारण त्यांचं त्यांनाच माहित! कमीत कमी घरात तरी स्वतःच्या मुलांसोबत मराठीत बोललं गेलंच पाहिजे.

अशा प्रकारे हिंदी-इंग्रजीचा, मराठीत शिरकाव केल्यास १०० वर्षांनी मराठीची चव अजूनच बेचव झालेली आढळून आल्यास आश्चर्य वाटायला नको!

# मराठी बाबतीत असंही होऊ शकतं!

मी एक स्वप्न बघितलं ते म्हणजे, आपल्या मराठी भाषेला अमर बनवायचं! अमर तिथपर्यंत बनवायचं, जिथर्यंत या भूतलावर सजीवसृष्टी आहे! हा विचारही मनात यायला नको की, पुढच्या ७० वर्षांत मराठी भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर जाणार आहे. अर्थात हे सारं एका रात्रीत घडणाऱ्यातलं मुळीच नाही.

चित्राचं कसं असतं ना, हळू हळू रंग फिक्कट बनत जातात आणि मग कित्येक वर्षांनी आपल्या लक्षात येतं की, त्या चित्रावरचे रंग आता पूर्णतः उडून गेले आहेत, तिथं आता फक्त कोरा कागद/ कापड उरला आहे.

# मराठी संवर्धन! उपाययोजना काय?

मराठी भाषेचं हे अमरत्व टिकून राहावं आणि मराठीचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार होण्यासाठी पुढील उपाययोजना आपण दीर्घकाळासाठी करू शकतो.

०१) आपण असं गमतीनं म्हणतो की, मुंबईच्या लोकल ट्रेनमधली भांडणं ही हिंदीमधून सुरु होऊन मराठीत संपतात.

आजकाल होतं काय की,  बराचवेळ हिंदीमध्ये गप्पा मारून माणसांना शेवटी कळतं की, समोरचा माणूस मराठीच आहे. (हा विनोद नसून तथ्य आहे!)

त्यासाठी एखाद्या अनोळखी माणसासोबत फोनवर बोलताना किंवा प्रत्यक्ष भेटताना Hello ने सुरुवात न करता “नमस्कार” बोलून सुरुवात केली पाहिजे. यामुळे समोरचा माणूसही मराठी असल्यास अथवा त्याला मराठी बोलता येत असल्यास तोसुद्धा मराठीतच बोलू लागेल. 

०२) सरकारी कार्यालयात मराठीमधूनच व्यवहार होणं अनिवार्य करावं लागेल.

०३) महाराष्ट्रभर ज्या ज्या पाट्या लागतात (दुकानांवर, हॉटेल्सवर, द्रुतगती मार्गावर) त्या सर्व पाट्या ह्या मराठी भाषेमध्येच लावल्या गेल्या पाहिजेत. जसं, दक्षिण भारतात जिकडे तिकडे तुम्हाला त्यांच्याच मातृभाषेमध्ये लिहिलेल्या पाट्या दिसतात. त्याप्रमाणेच अख्या महाराष्ट्रभर जिथं तिथं, रस्तोरस्ती, गल्लीबोळांत, जागोजागी मराठी शब्द, मराठी भाषा लिहिलेली दिसायलाच हवी. अगदी आपल्या डोळ्यांसमोर सतत मराठी भाषाच दिसायला हवी. कानांवर सतत मराठी शब्दच पडायला हवा!

०४) महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे. (जी प्रणाली दक्षिण भारतातल्या चारही राज्यांमध्ये आहे)

०५) संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी संख्येने मोठ्या प्रमाणावर अन् वेळोवेळी मराठी भाषेतील वेगवेगळ्या स्पर्धा झाल्यास जनमाणसातील मराठी आणखी प्रगल्भ, सशक्त, समृद्ध होण्यास मदत होईल व या स्पर्धांचे संस्करण तरुण पिढीवर दीर्घकाळ टिकेल. त्या स्पर्धा खालीलप्रमाणे –

मराठी भाषेतून कथा लिखाण स्पर्धा, कथा-कविता अभिवाचन स्पर्धा, काव्य लिखाण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा नाटक/एकांकिका स्पर्धा, मराठी लघुपट स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ स्पर्धा, मराठी गीत गायन स्पर्धा, मराठी गाण्यांवर नृत्य स्पर्धा, या आणि अशा स्पर्धा अख्या महाराष्ट्रभर सातत्यानं घेतल्या गेल्यास तरुण पिढीसह प्रौढ पिढीमध्येही महाराष्ट्राचा आणि आपल्या मायमराठी भाषेचा जागर-अभिमान दीर्घकाळ मनामध्ये खोलवर उतरेल. असं केल्यास मराठी भाषा ही केवळ  स्पर्धेपुरती मर्यादित न राहता नकळत माणसाच्या मेंदूत उतरेल.

०६) आपल्या मराठी व्यक्तींनी आजपर्यंत जागतिक आणि देशांतर्गत स्तरावर केलेली निष्णात कार्ये तरुण तसेच प्रौढ पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहचणे गरजेचे आहे. मग त्या व्यक्ती इतिहासातील असोत वा वर्तमानातील. जसे, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर जयवंत नारळीकर, भालचंद्र नेमाडे, डॉ. आनंदीबाई जोशी, सचिन तेंडुलकर, अनिल काकोडकर, लता मंगेशकर यांची माहिती प्रत्येक मराठी माणसाला माहिती असलीच पाहिजे. इतकेच नव्हे तर, आपल्या माणसांबद्दलचा अभिमान त्यांच्या उरात दाटून आलाच पाहिजे. यामुळे नवनवीन पिढीला प्रगल्भ कार्य करण्यास ऊर्जा मिळू शकेल व आपल्याच महाराष्ट्रातील मराठी मातीतील माणसं जगाला गवसणी घालत असल्याचा विश्वास त्यांच्यातसुद्धा निर्माण होऊन, जिद्द निर्माण होईल.

०७) सन्मान सोहळे – मराठी भाषेसाठी योगदान देणाऱ्या समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्तीचा आदर आणि गुणगौरव सोहळे वेगवेगळ्या स्वरूपात व्हायला हवेत. (मग तो कुठलाही असो. नियम एकच, मराठी भाषा संवर्धनासाठी त्यानं दिलेलं योगदान)

०८) शैक्षणिक संस्था – महाविद्यालयांची प्रत्येक वर्षाची नियतकालिके प्रकाशित केली जावीत. ज्यातून विद्यार्थी मराठीतून लिहिते होतील आणि वेगवेगळे प्रयोग ते लिखाणातून करू शकतील. त्यामुळे त्यांना चालना मिळेल आणि भविष्यात मराठीमध्ये परिणामकारक कार्य करण्याचं बळ त्यांना खूपच कमी वयामध्ये मिळू शकेल.

# राज्यव्यापी उपाययोजना काय?

हे झाले छोटे छोटे परंतु, अत्यंत परिणामी असे उपाय. आता सर्वात प्रभावी परंतु, राज्यव्यापी असा उपाय ज्यामुळे मराठी भाषा निश्चितच आणखी प्रगल्भ होण्यास मदत होईल. तो आहे शिक्षणपद्धतीचा!

शिक्षणपद्धती –  मराठीमध्ये एक म्हण आहे  “थेंबे थेंबे तळे साचे!” पण, आपल्याला तळं बनवायचंच नाही ना! आपल्याला तर अख्खा अथांग समुद्र निर्माण करायचा आहे. मग तो थेंबे थेंबे करून कसं चालेल? नाही का! त्यासाठी मोठं पाऊल उचलायची गरज आहे. त्यासाठी सर्वांत सक्षम आणि सशक्त पाया रचण्याची गरज आहे. हा पाया रचला जाऊ शकतो ते म्हणजे, पहिली ते बारावी या वर्गांच्या महाराष्ट्रातील शिक्षणपद्धतीमध्ये काही उपक्रम राबवून.

दुबईचा एक राजा बोलला होता की, “शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवे!” 

त्यातून त्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन दिसून येतो. आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विचारसक्षमता अन् निर्णयक्षमता, एखादा निर्णय मांडण्याची पद्धत आणि त्याची अंमलबजावणी यावर मातृभाषेचा थेट परिणाम होतोच असं त्यामागचं त्याचं उद्दिष्ट होतं.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे, इंग्रजी बोलता-लिहिता येणं, भाषा समजणं हे गरजेचं आहेच. कारण, जागतिक स्तरावर संवाद साधण्यासाठी इंग्रजीचाच वापर होतो. पण, जर भांडुपच्या गल्लीतील एक मराठी मुलगा, ज्याचं विश्व हे फक्त भांडुप या विभागापुरतंच मर्यादित आहे. तो जर का बोलत असेल, “आपुन मराठी people should explore by speaking in english only! इस्से क्या होगा की, अम्म्म्म… आपला standard वाढू शकतो, नाह्यतर काय व्होइन ना, च्यायला आपला मराठी माणूस ना, अम्म्म्म दुनिया किधर से किधर पोचेगी!”

अशा मुलांना स्वतःच्या मातृभाषेविषयी असलेली ही न्यूनगंडाची मानसिकता आणि इंग्रजीच्या हव्यासापोटी मातृभाषेला कमी लेखणं दिसून येतं आणि दुर्दैव म्हणजे, अशा सोंगांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या अशा मुलांमध्ये परिणामी पूर्णतः मराठी बोलताना आत्मविश्वासाची कमी जाणवते. कारण, हिंदी-इंग्रजी भाषा त्यांची नित्यनेमाची झालेली असते.

# इंग्रजी आणि मराठीचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना?

०१) संपूर्ण महाराष्ट्रात ज्याची मातृभाषा मराठी असून जो इंग्रजी शाळेतून शिक्षण घेतोय, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली ते बारावी मराठी भाषा हा विषय शिकणं अनिवार्य किंबहुना सक्तीचंच केलं पाहिजे. ज्यामुळे त्याचा मराठी भाषेबद्दलचा पाया कायमचा भक्कम होईल आणि १२ वर्षे मराठी विषय शिकल्यामुळे त्याला मराठी व्यवस्थित बोलता, वाचता, लिहिता येऊ शकेल. मुळात त्याला मराठीबद्दल न्यूनगंड निर्माण होणार नाही. ज्याप्रमाणे दक्षिण भारतातील चारही राज्यांनी स्वतःच्या मातृभाषेबद्दलची अस्मिता अबाधित राखलीये त्याचप्रमाणे इंग्रजीशी नाळ जोडल्या गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेची अस्मिता जागरूक राहील. 

०२) आतापासूनच मराठी माध्यमाच्या शाळेत अगदी इयत्ता पहिलीपासून चांगले, दर्जेदार इंग्रजी शिकवले गेले पाहिजे आणि प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून दर्जेदार मराठी शिकवले गेले पाहिजे.

०३) कल्पना करा की, एक इंग्रजी शाळा गच्च भरलेली आहे. तिथे ९ वी च्या वर्गात मराठीचा तास सुरु आहे. पन्नाशी ओलांडलेल्या एक शिक्षिका वर्गातील ५० विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि तितक्यात एक मुलगा हात वर करून उभा राहतो आणि बोलतो, “बाई हा माझ्यासोबत  हिंदीमध्ये बोलला!” शिक्षिका त्वरित बोलतात, “पटकन जागेवरून उठ आणि दंड म्हणून, समोर असलेल्या पेटीमध्ये १० रुपयांची नोट टाक. मराठीच्या तासाला मराठीमध्येच बोललं पाहिजे!” तो मुलगा लगेच उठतो आणि समोर असलेल्या पेटीमध्ये १० रुपयांची नोट टाकतो. वाचून आश्चर्यच वाटलं ना? अहो आत्तापर्यंत आपण सगळेच हे बघत आलोय की, शाळेमध्ये असताना इंग्रजीच्या तासाला इंग्रजीमध्येच बोलणं अनिवार्य आहे. इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत बोलल्यास ५ रुपये, १० रुपये दंड भरावा लागतो. त्याचप्रमाणे मराठीच्या तासाला देखील ही उपाययोजना करावी लागणार आहे.

# अतिशय महत्त्वपूर्ण उपययोजना?

चित्रपट – रुपेरी पडदा, रंगभूमी, टेलिव्हिजन या तीन माध्यमांमार्फत एखाद्या घटनेचा समाजाच्या खूप मोठ्या वर्गावर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे मराठी भाषेतील चित्रपट, नाटकं, टेलिव्हिजन कार्यक्रम यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. अर्थात त्या सर्व घटकांची दर्जा, शैली, परिणामकारकता, उत्कृष्ट प्रयोगशीलता उत्तम असायलाच हवी.

२०२० सालात मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच चित्रपटगृहे मिळवण्यासाठी झगडावं लागत आहे. त्यासाठी योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे. शहरी आणि निमशहरी भागात मॉल्स, मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे आहेत. त्यांत मराठी चित्रपटांना प्राइम टाइम आणि भरपूर प्रमाणात शोज मिळावे यासाठी मोठमोठ्या सिनेमा थिएटर्ससोबत PVR, BIG cinemas, INOX, Carnival Cinemas, Cinepolis यांसोबत मराठी सिनेमांनी भागीदारी करणं गरजेचं आहे. यामुळे जास्तीत जास्त निर्मात्यांना मराठी भाषेमधून चित्रपट बनवण्यासाठी भरपूर बळ, आत्मविश्वास आणि ऊर्जा मिळेल. ज्यामुळे मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार अधिक सशक्त, अधिक सक्षमपणे होऊन मराठी भाषा आणखी वृद्धिंगत होण्यात मदत मिळेल.

# मराठी संवर्धनासाठी काय गरजेचं?

रुपेरी पडदा (चित्रपट) आणि नाट्यगृह (नाटक ) या दोहोंच्या माध्यमातून मराठी भाषेची गोडी निर्माण करणं सहज शक्य आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शैलींतील/विषयांतील मराठी साहित्य वाचणं, ऐकणं गजरेचं आहे. कानांवर सतत मराठी भाषा पडत राहणं गरजेचं आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांसोबत मराठीतूनच बोलणं गरजेचं आहे. ज्यामुळे मराठी भाषा संवर्धनासाठी आणि समृद्धीसाठी बळ मिळेल आणि नवनवीन संकल्पनांना खतपाणी, चैतन्य लाभेल.

हे सर्व प्रकार केले तर आणि तरच आपण मराठी भाषा संवर्धनाचा हा उपक्रम हरेक घडीला अधिकाधिक प्रज्वल, उत्क्रांत आणि विकसित करू शकतो.

# महाराष्ट्रीय बोलींच्या संवर्धनासाठी?

मराठी आणि तिच्या बोलीभाषा  

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या

दऱ्याखोऱ्यांतील शिळा

– कुसुमाग्रज

या ४ ओळींत कुसुमाग्रजांनी गहण अर्थ सांगितला आहे. असं म्हणतात, भारतात प्रत्येक भाषा ही दर बारा कोसांवर बदलत जाते. जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातात व वाक्प्रचारांत बदलत असते. असे असले तरी, लिखित भाषेत फारसा फरक नसतो. मराठीत बोलीभाषा भरपूर आहेत. भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी, चंदगडी, मराठवाडी, वऱ्हाडी, कोंकणी, (इथ ही पाच दहा प्रकार आहेतच!) कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिरणी, नागपुरी, घाटी, आगरी कोळी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलानी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलीचे शेकडो नाही तर, हजारो प्रकार आहेत. ह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले अनेक शब्द आलेले दिसतात. जे लहान शब्दकोषात सापडतीलच असे नाही.     

# मराठीचा ठेवा आणि त्याचा अभिमान!

भारतात २२ अधिकृत भाषा असून वेगवेगळ्या प्रांतात मिळून १६५२ भाषा बोलल्या जातात. जगभरात मराठी बोलणाऱ्यांचा लोकसंख्येनुसार १५ वा नंबर लागतो.

सर्वप्रथम समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची बोली भाषा, मग ती कोकणी असो, आगरी – कोळी असो, घाटी असो, अहिरणी असो किंवा वऱ्हाडी, ती बोलण्याबाबत न्यूनगंड अजिबात बाळगू नये. उलट स्वतःची बोलीभाषा चार – चौघांत बोलून आपल्या भाषेबद्दल अभिमान अन गर्व बाळगावा.

महाराष्ट्र किंवा जगभर पसरलेल्या मराठी माणसात आपल्या बोलीभाषेबद्दलचा आत्मविश्वास हा असलाच पाहिजे. यासाठी विविध स्तरातील जे जातीवाचक भेद पडलेले जातात ते सगळे भेद विसरून आधी “मराठी भाषा” या एका छत्रछायेखाली एकत्र येणं गरजेचं आहे.

# मातृभाषा एक अभिमान!

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना म्हणजेच, व्लादिमीर पुतीन यांना इंग्रजी येत नाही. जगातला सर्वांत शक्तिशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ना इंग्रजी बोललेलं समजतं ना त्यांना बोलता येतं. प्रत्येकवेळी ते अनुवादक  वापरतात. ते आपल्या मातृभाषेमधूनच संभाषण करतात आणि होय याबद्दल त्यांना अजिबात संकोच किंवा न्यूनगंड नाहीये. कारण, त्यांची आपल्या मातृभाषेमधून संवाद साधन्याबद्दल त्यांना नितांत गर्व आहे.

जगातल्या या सर्वांत बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडून मराठी माणसानं काय शिकावं?

स्वतःच्या मातृभाषेबद्दल अभिमान बाळगला पाहिजे आणि अजिबात लज्जा न वाटता स्वतःची मातृभाषा बेदरकारपणे बोलली पाहिजे हे प्रत्येक मराठी मनात रुजलं पाहिजे.

# मराठी साता समुद्रापार!

मराठी महतीच्या महान गोष्टी जगभरात सांगितल्या पाहिजेत. मग ती मराठी मातीतील लावणी असो वा कुस्ती हा क्रीडा प्रकार, मराठी भाषेत लिहिलं गेलेलं साहित्य असो वा आपले खाद्यपदार्थ, महाराष्ट्रातील उत्तम पर्यटनस्थळे असो वा आपण वेगवेगळ्या विभागांत लावलेले नवनवीन शोध. हे सगळे घटक अख्या भारतासह संपूर्ण जगभर पसरवायला हवेत. यामुळे जगाला महाराष्ट्राची अन् मराठी माणसाची व्यापक, शोधक, कल्पक वृत्ती समजून येईल आणि मराठी भाषा दाही दिशी विखुरली जाईल.

केवळ आपल्या बोलण्यातूनच नव्हे तर, आपल्या आचारातून आणि विचारांमधून देखील मराठी भाषा दिसायला हवी. तरंच मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल आणि ही जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे. संगणकापासून स्मार्टफोनपर्यंत विविध तांत्रिक बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात मराठीचा शिरकाव होणं अपेक्षित आहे. मराठीचा घंटानाद सतत कानांवर येणं महत्वाचं आहे. 

# गर्व आहे मला, मी महाराष्ट्रीय असल्याचा!

होय, मला माझ्या मातृभाषेचा, माझ्या मायमराठीचा नितांत अभिमान आणि आदर आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो असणारच!

हेच प्रतिपादन प्रत्येक मराठी माणसानं करायला हवं. तर आणि तरच आपली मायमराठी अमर होईल आणि या साऱ्यामुळे मराठीचा डंका जगभर सदासर्वदा त्रिभुवनी वाजत गाजत राहील आणि आजपासून १०० काय, १००० वर्षांनंतरही मराठी भाषेचं स्थान महाराष्ट्राच्याच नव्हे तर, जगाच्या पटलावर आबाधित राहील.

तुम्हाला काय वाटतं? मराठीला आणखी समृद्ध करण्यासाठी काय करता येईल?

लेख कसा वाटला? कमेंट मध्ये जरूर सांगा आणि Like, Comment, Share करायला विसरू नका.


लेखक

अक्षय अंबादास टेमकर

ईमेल – akshaytemkar8795@gmail.com

संपर्क – 8652826033

एकवचनी: 1 विचार “How to preserve Marathi? | मराठी भाषा मरत आहे का? उपाययोजना काय? वाचा!”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!