Home » How to manage time? | वेळेचे नियोजन कसे करावे?
Time Management, टाइम मॅनेजमेंट

How to manage time? | वेळेचे नियोजन कसे करावे?

Reading Time: 4 minutes

वेळ पुरत नाही? वेळ कसा मॅनेज करावा? समजत नाहीये! 

याच मुद्द्यावर बोलण्यासाठी मी घेऊन आली आहे हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठी.

तुम्ही जर १५ मिनिटं टाईमपास करणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की, त्या १५ मिनिटाने काय फरक पडणार आहे, तर तुम्ही हा लेख वाचायलाच हवा!

चला तर मग वेळ न दवडता, सुरू करूया.

वेळेचे व्यवस्थापन/Time management

वेळ राखणे/Time Keeping, संघटन

मित्रहो, समजा तुम्ही कॉलेज ला जाणार आहात आणि मध्येच तुम्हाला वाटले की, कुठेतरी जरा थांबूया. तुम्ही टपरीवर चहा पिण्यासाठी १५ मिनिटं घालवले. त्याच वेळात तुमची बस निघून गेली. तुम्ही कॉलेजला १५ मिनिटं उशिरा पोहचले. कॉलेजच्या बाहेर गेट बंद करण्याची सिस्टीम असेल, तर तुमचे १ तासाचे लेक्चर मिस होईल. समजा, जर गेट बंद करण्याची सिस्टीम नसेल, तर तुम्ही वर्गात १५ मिनिटं उशिरा पोहचणार त्या १५ मिनिटांमध्ये सरांनी जे शिकवले ते तुम्हाला समजणार नाही. पर्यायी तुम्ही त्या १ तासाच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे निष्क्रिय राहाल. तो गेलेला एक तास तुम्हाला परत मिळणार नाही. म्हणजेच तुम्ही इतरांपेक्षा एक तासाने मागे राहाल. त्या एका तासाचा लोड तुमच्या दुसऱ्या दिवसावर पडेल. हळूहळू तुमचा सगळा शेड्युल बिघडत जाऊन ते तुमच्या तणावाचे  कारण बनेल.

आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही आणि म्हणूनच आपण इतरांपेक्षा मागे राहतो. त्याचे कारण तुमचे नसलेले नियोजन होय.

वेळ सगळ्यांना सारखाच मिळतो. पण, कोण किती उपयोग करवून घेतो! त्यावरून वेळेचे महत्त्व दिसून येते. त्यासाठी कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे, कुठे दुर्लक्ष करायचे हे आपल्याला जमले पाहिजे.

वेळेचे व्यवस्थापन!

यापूर्वी टाईम किपिंग आणि संघटन बघितले तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की, वेळचे व्यवस्थापन कसे करायचे???

खरं तर वेळेचे व्यवस्थापन करणे खूप अवघड आहे. तरीही काही प्रमाणात जाणीवपूर्वक आपण ते सहज करू शकतो. ते कसे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया.

०१) ध्येय ठरवणे :

आपल्याला जे करायचे आहे ते आधी ठरवून घ्यावे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यापैकी आपल्याला आवड कशात आहे आणि आपण काय पद्धतशीरपणे करू शकतो, हे ठरवणे गरजेचे आहे. म्हणजे ऐनवेळी  होणारा गोंधळ टाळून  वेळेत काम होऊ शकेल.

०२) कामांना प्राधान्यक्रम देणे : 

आपल्या अवतीभवती अनेक कामाच्या लिस्ट असतात. म्हणून, कोणत्या वेळी कोणते काम करावे, महत्वाचे कोणते हे आधीच ठरवून घ्यावे. म्हणजे, आयत्या वेळी गोंधळ होणार नाही.

०३) कामातील चालढकलपणा टाळणे / वक्तशीरपणा पाळणे :

जो वेळ तुम्ही ठरवला आहे, त्याच वेळात ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळाने करूया, आता कंटाळा येतोय. त्यापेक्षा फ्रेश माईंडने उद्याच सुरु करेल असे वक्तव्य जाणीवपूर्वक टाळा. “कल करे सो आज कर, आज करे सो अब” हे तत्व मनात कोरून ठेवा. याचा नक्कीच फायदा होईल.

०४) अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे : 

आपल्या भोवती लक्ष विचलित करणारे अनेक प्रेरक असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम त्याहीपेक्षा महत्वाचे, हे सारखे मनाला सांगत राहणे गरजेचे असते. अभ्यास करताना बाहेर हॉर्न वाजला की, लगेच लक्ष तिकडे जातं. पण, आपण वाचत असलेल्या भागातून प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा, आपण जाणीवपूर्वक तिकडे लक्ष देतो. त्यालाच मानसशास्त्रामध्ये अवधान असे म्हणतात.

०५) स्वतःचे कॅलेंडर तयार करणे : 

आपल्याला जे करायचे त्याची यादी कॅलेंडर स्वरूपात मांडावी.

उदा. 

सकाळी ०६:०० ते ०८:०० अभ्यास 
सकाळी ०८:०० ते १०:०० दैनंदिन कार्य
सकाळी १०:०० ते १२:०० अभ्यास
सकाळी १२:०० ते ०१:०० जेवण

असे तुम्ही सेट करून ठेवल्यास एक पद्धतशीर आणि शिस्तबद्धपणा तुमच्या रोजनिशी मध्ये येतो. परिणामी वेळ वाचवता  येऊ शकतो.

एवढे करूनही कधीकधी मध्येच काम आल्याने आपल्याला अभ्यास सोडावा लागतो. अशा वेळी आपण १ तास नेहमी लवकर सुरुवात करायला हवी. जेणेकरून, मध्येच अभ्यास सोडावा लागला तरी, तुम्ही तो वेळ कव्हर करू शकाल.

दिरंगाई/विलंब

एखादे कठीण, कंटाळवाणे काम आपल्याला अप्रिय अनुभूती देत असते. यामध्ये नवल करण्यासारखे काहीच नाही. अप्रिय घटना वा दुःख टाळण्याचा स्वभाव आपल्या सगळ्यांमध्ये असतो. त्याची कारणे आपण बघूया.

०१) हे अवघड आहे. 
०२) त्या कामात इंटरेस्ट येत नाही.
०३) नेमके कुठून सुरू करायचे ते माहीत नसते.
०४) विशेष महत्वाचे वाटत नाही.

वरील सगळे विचार तुम्हाला विलंब करण्यास भाग पाडत असतात. जर सुरुवात कुठून करावी हाच प्रश्न असेल, तर बाकीचा डोंगर मागेच राहतो. जे काम हातात घेतले त्याचे महत्त्वच वाटत नसेल, तर आपण तिकडे लक्ष का देणार? नाही का..! 

हे अवघड आहे किंवा मला जमणार नाही. हा सुरुवातीलाच शब्द असला! तर, पुढचे काम सोपे कसे होईल???

इत्यादी गोष्टी मुळे आपण विलंब करतो वा कार्यात दिरंगाई करत असतो.

उपाय :

या सर्व गोष्टींचा विचार करता त्यावरील उपाय आपण बघूया.

०१) आपले कार्य अधिक आनंददायी बनवण्याचे मार्ग शोधा : 

जे करतोय ते अनिवार्य असले की, ते करावेच लागते. मग त्याला उशीर केला तरी, त्या कामातून तुमची सुटका नाही. मग अशावेळी आपले काम कसे आनंददायी बनवता येईल त्याकडे लक्ष द्या. 

उदा. ०१ : इंद्रधनुचे रंग लक्षात ठेवण्यासाठी आपण “जा ता ना ही पा नी पी.” अशी ट्रिक वापरतो. ज्यामुळे त्या कार्यात आपला इंटरेस्ट निर्माण होतो. 

उदा. ०२ : सांगायचे झाल्यास प्रशासनात गुलीकने सांगितलेली Posdcorb पद्धतीचे आपण अवलंब करू शकतो.

Posdcorb पद्धती बाबत विस्तृत माहितीचा हा व्हिडिओ एकदा बघाच! 👇

पोस्डकार्ब:कुशल प्रशासक को जानना ज़रूरी/POSDCORB: Necessary for Good Administrator/डॉ ए के वर्मा
सौजन्य : mbaskool

आपल्यामध्ये क्षमता नाही म्हणजे, आपण स्वतःला दोष देत राहतो आणि परिणामी कार्यात विलंब होतो. हे दूर करायचे असेल तर, आधी स्वतःला सांगू शकतो की, ठीक आहे माझ्याने पहिल्या प्रयत्नात ती गोष्ट होणार नसेल तर, मी त्यासाठी परत प्रयत्न करेल. म्हणजे, स्वतः मधील अक्षमता तुमच्या क्षमते मध्ये रूपांतरित होईल. ज्याचा फायदा तुम्हाला भविष्य घडविण्यात होऊ शकतो.

आज आपण वेळेचे व्यवस्थापन कसे करावे त्यामध्ये ध्येय ठरवणे, कामांना प्राधान्यक्रम देणे,कामातील चालढकलपणा टाळणे, अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, स्वतःचे कॅलेंडर तयार करणे हे बघितले तसेच वेळ राखणे म्हणजे काय आणि दिरंगाई म्हणजेच कामात विलंब का होतो, ते ही बघितले. जर ह्या गोष्टी होत असतील आणि विलंब होत असेल तर, तो कसा टाळता येईल यासंदर्भात उपाय देखील बघितले. 

मला वाटतं ह्या गोष्टी नक्कीच आपल्या सर्वांच्या थोड्या प्रमाणात का होईना शंका दूर करणाऱ्या ठरतील.

तुम्ही जर कन्फ्युज असाल, तुम्हाला जीवनात काही प्रश्न पडली असतील तर, त्यातून बाहेर पडण्यासाठी निर्माण करेल सहायता! कसं काय वाचा हा ब्लॉग. 👉 निर्माण ब्लॉग

मित्रहो, असेच अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो, लेख कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.


लेखिका

तेजस्विनी प्र. राऊत

लेखिका “सामाजिक तसेच तरुणांच्या मनातलं” या विषयावर लिखाण करत आहेत.

शिक्षण – MSW(HRM), DTEd 

Email – tejswiniraut22@gmail.com

एकवचनी: 1 विचार “How to manage time? | वेळेचे नियोजन कसे करावे?”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!