Home » Bharat Ratna🎖Dr. Babasaheb Ambedkar | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते? आणि का? या व इतर सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एकाच लेखात!

Bharat Ratna🎖Dr. Babasaheb Ambedkar | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते? आणि का? या व इतर सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एकाच लेखात!

Reading Time: 4 minutes

०१) परिचय :

“तुम्ही वाघासारखे बना म्हणजे, तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही!”

असे धाडसी विचार उरी बाळगणाऱ्या, महामानवाचा जन्म, १४ एप्रिल इ. स. १८९१ रोजी महू, मध्य प्रांत, ब्रिटिश भारतात झाला. सध्या त्या पावनभूमीला भीम जन्मभूमी असे म्हणतात. जी सध्या डॉ. आंबेडकर नगर, मध्य प्रदेशातील एक पवित्र ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक विचारवंत असण्यासोबतच सामाजिक दृष्टीकोन ठेवून स्वतंत्र विचारांनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्त्व असल्याचे, त्यांच्या बहिष्कृत हितकारिणी सभा, समता सैनिक दल सारख्या सामाजिक संस्था तसेच, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी, द बॉम्बे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्ट, पीपल्स एज्युकेशन सोसायटी सारख्या शैक्षणिक संस्था आणि भारतीय बौद्ध महासभा सारख्या विविध संस्थांतून झळकते.

०२) आई – वडिलांचे चौदावे अपत्य होते बाबसाहेब

वडील रामजी आणि आई भीमाबाई यांच्या पोटी जन्मलेले बाबासाहेब हे चौदावे अपत्य. वडिलांकडून मिळालेले संस्कार आणि थोर संतांच्या शिकवणीचा प्रभाव बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अनुकूल ठरल्याचे दिसून येते. रमाबाई सारख्या प्रेमळ, काळजीवाहू आणि त्यांच्या यशात हातभार लावणाऱ्या जिवनसंगिनी त्यांना लाभल्या हे, समर्पित जीवनाचे उदाहरण, समाजापुढे ठेवून एक शिकवण त्यांनी आपण सर्वांना दिली.

०३) उच्चविद्याविभूषित व्यक्तीमत्व

डॉ. बाबासाहेब हे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्याचबरोबर त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. परदेशातून अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट (पीएच. डी.) पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच. डी. व डी. एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियायी व्यक्ती म्हणून त्यांना मान आहेच.

Bharatratn Babasaheb ambedkar mahamanav

०४) विद्येचा सागर

नोव्हेंबर १८९६ ते नोव्हेंबर १९२३ या २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. बी. ए., एम. ए., पीएच. डी., एम. एससी., बार ॲट-लॉ, आणि डी. एससी. अशा पदव्या त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे पुरावे देतात. इ. स. १९५० च्या दशकात त्यांना एल. एल. डी. आणि डी. लिट. सारख्या सन्मानित पदव्या प्रदान करण्यात आल्या.

०५) लेखणीतून सामाजिक बदल

बाबासाहेब म्हणतात,

“लक्षात ठेवा, तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे म्हणून, तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा.”

असे परखड विचार मांडून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले.

०६) अफाट ग्रंथसंपदा आणि निर्भिड पत्रकारिता

स्वतः त्यांनी किती तरी ग्रंथ आणि वृत्तपत्रे प्रकाशित केलीत. त्यांच्या मते, कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते.

मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.

त्यानंतर बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता/प्रबुद्ध भारत (१९३०) इत्यादी वृत्तपत्रांतून त्यांनी समाज प्रबोधनपर लिखाण केले. 

०७) प्रबंध लिखाण आणि सामाजिक प्रश्न

विद्यार्थी दशेत बाबासाहेबांनी अनेक प्रबंध लिहिले ज्यात त्यांचा दूरद्रष्टेपणा दिसून येतो. एम. ए. मधील “प्राचीन भारतीय व्यापार”, पीएच. डी. मधला “भारताचा राष्ट्रीय लाभांश”, एम. एससी. मधला “ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण”, डी. एससी. मधला “रुपयाचा प्रश्न” इत्यादी अभ्यासपूर्ण प्रबंध त्यांनी लिहिले.

डॉ. बाबासाहेबांची दूरदृष्टी किती प्रबळ हे त्यांच्या, “लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे, हुकुमशाही आणि माणसा-माणसांत भेद मानणारी संस्कृती!” या वाक्यावरून समजून येते. बारकाईने बघितल्यास, देशात बाबासाहेबांच्या ह्या विचाराचा अंश दिसून येईल!

०८) सत्याग्रह आणि चळवळी!

“जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही” याच विचाराला सिद्ध करून दाखवायला बाबासाहेबांनी वंचितांना त्यांचे सामाजिक स्वातंत्र्य आणि हक्क मिळावे म्हणून, स्वतःच्या हक्कांना दूर सारले आणि अहोरात्र त्यांच्यासाठी ते झटले. स्वतःवर झालेला अन्याय सहन करून शांत न बसता त्याविरोधात त्यांनी आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी अंबाबाई मंदीर प्रवेश सत्याग्रह अमरावती (१९२७), महाड सत्याग्रह (मार्च १९२७), मनुस्मृती दहन (डिसेंबर १९२७), पर्वती टेकडी मंदीर सत्याग्रह पुणे (ऑक्टोबर १९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह नाशिक (मार्च १९३०) असे विविध मार्ग अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अवलंबले. काही यशस्वी झाले तर, काही फसले मात्र, त्यातून समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी न चुकता केले.

बाबासाहेब म्हणतात,

“तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे”

त्यांचे हे विधान समाजाला एक वेगळाच संदेश देणारे ठरते.

०९) भारताचे प्रतिनिधित्व

तिन्ही गोलमेज परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे, पुणे करारावेळी स्वतःच्या आग्रहाला बाजूला ठेऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या निर्णयांचा आदर करत त्यांच्या निर्णयांना पाठिंबा देणारे, हिंदू कोड बिल सारख्या मुद्द्यावर मतभेद झाल्यामुळे धाडसी निर्णय घेत मंत्रिपदाचा राजीनामा देणारे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकमेव होऊन गेले. त्यांच्यानंतर तसे धाडसी व्यक्तिमत्त्व बघायला मिळणे अवघड!

१०) स्व:सुख मान्य नसणारा एकमेव नेता

मजूर, स्त्रिया, वंचित यांच्या हक्कासाठी स्वतःचे सुख न बघता झटणारा महामानव हा राष्ट्रीय नेताच म्हणावा लागेल! आज ही उपयोगी पडणारे विचार त्या काळी बोलून दाखवणे फक्त त्यांनाच जमले. ते म्हणतात,

“हिंसा ही वाईट गोष्ट आहे मात्र गुलामी ही त्याहीपेक्षा वाईट!”

जनतेला गुलामी करण्यापासून थांबवणारा नेताच राष्ट्रीय नेता म्हणवून घेण्या योग्य आहे.

११) पूर्वग्रह दूर करणारा ग्रंथ

बाबासाहेबांची ग्रंथसंपदा समुद्राइतकी अफाट आहे.  १९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शूद्र पूर्वी कोण होते?” हा ग्रंथ लिहिला आणि महत्वाचे म्हणजे ज्योतिबा फुलेंसारख्या महापुरुषाला समर्पित करून त्यांनी या ग्रंथाला जीवनदान दिले. हा एक शोधग्रंथ आहे. ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेले.

शूद्र शब्दाची उत्पत्ती शाब्दिक नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते सूर्यवंशी आर्य क्षत्रिय लोक होते, असे ग्रंथात मांडण्यात आलेल्या विचारांवरून समजते. माणसा – माणसांत मतभेद होऊन ते मतभेद कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण या ग्रंथातून आपल्यासमोर मांडण्यात आले आहे.

एकाच समुदायातील दोन गटांमधील आपापसातील शाब्दिक अतिक्रमणामुळे निर्माण झालेला तिरस्कार आणि परिणामी पुढची काही वर्षे एका गटावर, दुसऱ्या गटाद्वारा अस्पृश्यतेचा ठपका ठेवण्याचे धाडस कसे जन्म घेते हे देखील यातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

१२) धाडसी व्यक्तिमत्त्व

एखादी गोष्ट पटली नाही तर, त्यातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेण्यात ही ते मागे हटत नसत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे, बौद्ध धर्माचा स्विकार करणे!

आज २१ व्या शतकातील तरुणांनी त्यांच्याकडून घ्यावयाची शिकवण म्हणजे, कोणालाही न घाबरता स्वतःचे धाडसी निर्णय घेणे. त्यांच्या ह्याच धाडसीपणामुळे ते राष्ट्रीय नेते झाले. आज गरज आहे ती त्यांचे स्वतंत्र विचार अंगिकारण्याची, त्यावर अभ्यासपूर्ण विचार करण्याची, आणि त्याचा अवलंब आपल्या आयुष्यात निर्णय घेताक्षणी करण्याची.

१३) ज्वलंत व्यक्तीमत्व

०६ डिसेंबर १९५६ रोजी जरी ह्या महामानवाच्या हृदयाने धडधड बंद केली असली तरी, त्यांचे विचार आजही तरुणांना पेटून उठण्यासाठी पुरेसे आहेत. गरज आहे ती फक्त चूक ते चूक म्हणण्याची!

“तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा, ते मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल.”

असे म्हणणारे बाबासाहेब त्यांच्या उच्च विचारांमुळेच राष्ट्रीय नेते झाले. अशा महामानवाला कोटी कोटी नमन!


लेखिका

खुशाली ढोके

लेखिका M.com आहेत आणि सध्या महिला सबलीकरण या विषयावर काम करत आहेत.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!