Home » दहावी नंतर पुढे काय? | SSC Board Exam & then what?
achievement, success, mountain-5597527.jpg

दहावी नंतर पुढे काय? | SSC Board Exam & then what?

Reading Time: 5 minutes

पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अवश्य वाचा! (SSC Result, SSC Result, Career after SSC, 10th Maharashtra Board)

दहावीचं वर्ष सुरू झालं की, डोक्यावर टांगती तलवार कायम असते. ”तू यंदा दहावीला आहेस, जोमाने अभ्यास कर. दहावीच्या मार्कांवरच तुझं आयुष्य ठरणार आहे.” वगैरे वगैरे सांगून मुलांना दबावाखाली ठेवले जाते. वर्षभर अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून मुलं बाहेर पडतात खरी! पण, मग प्रश्न पडतो आता दहावीनंतर पुढे काय?  या सगळ्यात योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मुलं मर्यादित पर्यायांचा अवलंब करतात.

माझ्या अनुभवानुसार, दहावीनंतर पुढे काय? या यक्षप्रश्नाचा विचार करताना मुख्यत: खालील बाबींचाच फक्त आजकाल विचार केला जातो.

०१) पालकांची मानसिकता –

बऱ्याचदा आपली स्वप्नं अपूर्ण राहिल्याने ती मुलांकडून पूर्ण व्हावीत, अशी पालकांची अपेक्षा असते. याच अट्टाहासापायी आपल्या आवडीच्या क्षेत्रात पालक मुलांना घालतात.

०२) मित्रांच्या संगतीने –

“माझा मित्र कॉमर्सला अॅडमिशन घेतोय, मी पण कॉमर्सलाच जाणार!” अशा प्रकारची वाक्य दरवर्षी कानावर पडतात. आपल्या आवडीचा विचार न करता, तो करतो म्हणून, मी ही करणार. या मानसिकतेमुळे कित्येक मुले चुकिचे निर्णय घेतात.

०३) अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने –

दहावीनंतर नक्की कोणत्या करिअरच्या संधी आहेत? हे माहित नसल्याने मुलं अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणं पसंत करतात.

०४) आपली आवड कशात आहे याचा शोध –

लहानपणापासूनच ती छान गाते, तिला तुम्ही गायकच बनवा वगैरे. आपली आवड आणि कौशल्य कशात आहे. हे लक्षात घेऊन आपण त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकतो. यासाठी शिक्षणासोबतच घरच्यांचा पाठिंबा ही महत्त्वाचा आहे. पण असा विचार खूप कमीजण करतात.

०५) गुणांवर आधारित –

मला दहावीला ९०.००% आहेत. मी सायन्सच घेणार! चांगली टक्केवारी मिळाली की, कोणताही कठीण कोर्स मी करू शकतो. असा विचार करून मुलं कोर्सला प्रवेश घेतात.       

०६) वैयक्तिक महत्त्वाकांक्षा –

मला मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचंय! काही जणांचं अगदी लहान वयातच भविष्यात काय व्हायचं हे ठरलेलं असतं. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला वेळ लागत नाही.

०७) स्टेटस –

उच्चभ्रू लोक आपल्या पाल्यांना उच्च प्रतीचे शिक्षण देऊ करतात. या नादात मोठ मोठ्या कोर्सला प्रवेश दिला जातो.

०८) सर्टिफिकेट कोर्स –

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने काही मुलं वेगवेगळ्या कोर्सला प्रवेश घेतात. या कोर्सेसचा कालावधी सहा महिने ते वर्षभर असतो.

०९) ट्रेंडींग –

आजकाल ट्रेंड्सचा जमाना आहे. गेमिंग, कोडींग, ग्राफिक्स वगैरेचा ट्रेंड आला की, काहीजण त्याकडेही वळतात.

अशाप्रकारे आपण दहावीनंतर पुढे काय करायचे याचा निर्णय घेताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या जातात याचा आढावा घेतला.

आता आपण दहावीनंतर कोणकोणत्या प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत याचा विचार करू.

दहावीनंतर सर्वज्ञात असलेल्या तीन शाखा म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स.  बहुतेक सर्वच विद्यार्थी याकडे वळतात. पण, योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना यातील करिअरच्या संधीचा फायदा घेता येत नाही.

मग आता आपण या तीनही शाखेचा अभ्यास करू.

०१) आर्ट्स – आर्ट्स म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर कलेशी निगडित गोष्टी येतात. आर्ट्सला जास्त करिअरच्या संधी उपलब्ध नाहीत, असं चित्र आपल्यासमोर उभं केलं जातं किंवा कॉमर्सला नाहीतर सायन्सला अॅडमिशन न मिळाल्याने विद्यार्थी आर्ट्स कडे वळतात. पण, ही मानसिकता चुकिची आहे. आर्ट्स शाखेला करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

उदा : व्हिज्युअल आर्टस, कायदा, भाषा आणि व्यवस्थापन या क्षेत्रांत ही खूप शाखा उपलब्ध आहेत. आपण फक्त पर्याय शोधले पाहिजेत. शिवाय या शाखेतून शिक्षक, स्पर्धा परीक्षा, लेक्चरर तसेच एक विशिष्ट विषय निवडून पीएचडी करता येते.

०२) कॉमर्स  – आपल्याकडे कॉमर्स शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. कॉमर्स शाखेचा पैशाशी खूप जवळचा संबंध येतो. या शाखेचे अकाऊंटींग, फायनान्स, इकोनॉमिक्स, ट्रेड आणि बिझनेस हे विभाग पडतात. या प्रत्येक विभागात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

०३) सायन्स – दहावीनंतर सायन्स निवडण्यामागे प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. काहीजण टक्केवारीमुळे, काही पालकांचं ऐकून, काही मित्रांच्या संगतीत सायन्स शाखेकडे वळतात. सायन्स म्हणजे, कठीण याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं जातं. पण, या शाखेत करिअरच्या दृष्टीने भरपूर मोठ्या संधी उपलब्ध असतात.

उदा : इंजिनिअरिंग, आयटी, अॅग्रीकल्चर, फार्मसी, डिप्लोमा इत्यादी‌. यातील प्रत्येक विभागाचा आवाका खूप मोठा आहे. ज्यांना तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकमध्ये आवड आहे त्यांनी विज्ञान शाखेकडे वळावे.

०४) डिप्लोमा – दहावीनंतर लगेचच डिप्लोमा करता येतो. पण, इंग्रजी विषयाच्या भितीमुळे असेल किंवा किचकट अभ्यासामुळे असो विद्यार्थी डिप्लोमा कोर्सला अॅडमिशन घ्यायला घाबरतात. परंतू डिप्लोमाचा तीन ते चार वर्षांचा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या कितीतरी संधी उपलब्ध होतात.

डिप्लोमा कोर्सची काही उदाहरणे खालील प्रमाणे –

डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस, डिप्लोमा इन सिरामिक टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन आर्किटेक्चर, डिप्लोमा इन अप्परेल डिझाईन आणि मर्चंडाजिंग, डिप्लोमा इन  बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, डिप्लोमा इन बायोटेक्नोलॉजी, डिप्लोमा इन बायोमेडिकल सायन्स इत्यादी.

५) फॅशन डिझायनिंग – ज्यांना कलेतील विविध क्षेत्रात आवड आहे. त्यांनी फॅशन डिझायनिंग कडे वळायला हरकत नाही. बहुतेक स्त्रिया किंवा मुली फॅशन डिझायनिंग करण्यात रस घेतात. फॅशन डिझाईनिंग हे फक्त कपड्यांशी निगडित नसून, त्यातही खूप प्रकार येतात.

उदा: ज्वेलरी डिझायनिंग, अक्सेसरीज डिझायनिंग, टेक्सटाइल डिझायनिंग, लेदर डिझायनिंग, फोटोग्राफी डिझायनिंग, फुटवेअर डिझायनिंग, इव्हेंट कोऑर्डीनेटर, फॅशन फोरकास्टर, रिटेल मर्चंडायजिंग, फॅशन फोटोग्राफर, क्रिएटिव्ह डिझायनर इ. पर्याय उपलब्ध आहेत.

the palm, atlantis, hotel-962785.jpg

०६) हॉटेल मॅनेजमेंट – हल्ली सर्रास कानावर पडणारा लोकप्रिय कोर्स म्हणजे, हॉटेल मॅनेजमेंट! दहावीनंतर तीन वर्षांचा हा कोर्स आपल्याला करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देतो. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये हॉटेल्सचं प्रत्येक डिपार्टमेंट कशा रितीने हाताळलं जातं याबद्दलच प्रशिक्षण दिलं जातं. उदा :

०१) मास्टर/बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी.

०२) मास्टर/बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पीटॅलीटी अँड हॉटेल अॅडमीनीस्ट्रेशन

०३) डिप्लोमा इन हॉटेल अँड केटरिंग टेक्नॉलॉजी

हाउसकिपिंग, वेटर, बेकरी, कुकरी.

७) आयटीआय – दहावीनंतर निवडल्या जाणाऱ्या पर्यायांपैकी आयटीआय हा देखील एक पर्याय आहे. दोन वर्षांचा हा कोर्स केल्यानंतर लगेचच करिअरची द्वार खुली होतात. यापुढील शिक्षणासाठी डिप्लोमा हा पर्याय देखील उत्तम ठरतो. तर, आयटीआय ची काही उदाहरणे खालीलप्रमाणे –

आयटी टर्नर, आयआयटी मेकॅनिक, आयटी वेल्डर, आयटी प्लंबर, आयटीआय इलेक्ट्रीशियन अशी बरीच उदाहरणे देता येतील.

०८) सर्टिफिकेट कोर्स – सर्टिफिकेट कोर्स हे कमी कालावधीचे आणि कमी फिसचे असल्यामुळे अधिक प्रभावी असतात. सर्टिफिकेट कोर्सची काही उदाहरणे खालीलप्रमाणे –

code, coding, computer-1839406.jpg

वेब डिझायनिंग, सायबर सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग

अशाप्रकारे भरपूर क्षेत्रात आपल्याकडे संधी उपलब्ध आहेत. एकाच चौकटीत वावरणारी मुलं अशावेळी भांबावून जातात‌. आता पुढे काय? खरंतर आताच्या काळात करिअरचे खूप पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण, दहावी झाली की, सर्वात आधी डोक्यात येतं ते आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स. खरतर सर्वांची आधीपासूनची मानसिकताच अशी झालीये की, या पलीकडचे पर्याय असूनही आपल्याला दिसत नाहीत. सर्व करतात म्हणून, मी ही तेच करणार या मानसिकतेमुळे योग्य निर्णय घेता येत नाहीत आणि मग बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. दरवर्षी लाखो विद्यार्थी एकाच विभागातून शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि मग नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत म्हणून, तक्रार करत बसतात.

दहावीनंतर पुढे काय? याचं उत्तर शोधताना या खालील काही बाबी लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल.

०१) आपला इंटरेस्ट शोधून त्या नुसार निर्णय घेणे.

०२) त्या शाखेशी निगडीत कॉलेज, जागा, फिस याबद्दल माहिती मिळवणे.

०३) आपली आवडनिवड आणि  बौद्धिक क्षमता याची सांगड घालणे. 

इतरांची मतं विचारात न घेता स्वतःच्या आवडी व कौशल्यानुसार निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. आपला सर्वांगीण विकास होतो. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर योग्य निर्णयासोबत अचूक मार्गदर्शन आणि पाठींबा मिळाला की, यश आपलं असतं.

मित्रांनो अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.


लेखिका

प्रज्ञा हरिश्चंद्र नाईक

लेखिका वाणिज्य शाखेतून पदवीधर आहेत.

pradnya201098@gmail.com

अनेकवचन: 2 thoughts on “दहावी नंतर पुढे काय? | SSC Board Exam & then what?”

  1. पिंगबॅक: SSC/HSC result trolling | बारावीच्या निकालावरून ट्रोलिंग करणाऱ्यांनो, Hypocrisy की भी हद होती है. | तरुणाई डॉट कॉम

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!