Home » Happy Independence Day | India@75 | स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष – पंचविशीतल्या पिढीचे अमृतानुभव
independence day

Happy Independence Day | India@75 | स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष – पंचविशीतल्या पिढीचे अमृतानुभव

Reading Time: 2 minutes

आज भारत देश पंचाहत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा करत अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. आज २५ वर्षाची असलेली आमची पिढी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात जन्माला आलेली. ज्या पिढीचा महाविद्यालयीन कालखंड सोशल मिडीयाचा सुवर्णकाळ ठरला ती आमची पिढी. हल्ली व्हॉट्सअप चे स्टेटस हेच देशभक्तीचे प्रमाण असताना आमच्या लहानपणीचा स्वातंत्र्य दिन आठवतो. स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण म्हटलं की, एक लगबग असायची. एक वेगळाच उत्साह असायचा.

आदल्या दिवशी शाळेत मैदानाची सगळी साफसफाई, परेड ची तालीम, युनिफॉर्मची धुलाई व ईस्त्री अशी बरीच तारांबळ असायची. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठायचं, रेडिओ वर लागलेले ‘स्वतंत्रते भगवती’ गीत ऐकत अंघोळ करुन स्वच्छ ईस्त्रीचा गणवेश घालायचा, धावत-पळत शाळेत पोहोचून रांगेत पुढे उभारायचं, राष्ट्रध्वजाला नमन करुन मग मित्राचा हात पकडून स्वातंत्र्याच्या घोषणा देत प्रभातफेरी व्हायची. संपूर्ण गावाला फेरी मारुन ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणासाठी ठरलेल्या मैदानावर जमायचं, वाटेत जाताना चौका-चौकात चॉकलेट-गोळ्यांची मेजवाणी असायची. आपल्या गल्लीतून फेरी आल्यावर एक वेगळाच रुबाब असायचा. साग्रसंगीत ध्वजारोहण व्हायचं, मोठ्या आवेषाने “भारत माता की जय” च्या घोषणा देताना असेल नसेल तेवढा जोर लावायचो. विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार सादर व्हायचे, तेंव्हा आपल्या शाळेचा नंबर आला की टाळ्या आणखी जोरात कशा वाजतील हा प्रयत्न असायचा. गुणवंतांच्या सत्काराप्रसंगी कधी आपलं नाव आलं तर आपल्यापेक्षा मित्रांना भारी आनंद असायचा. आपलं सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र एकदा व्यासपीठावरुन घेऊन खाली आलो की मग ते सगळ्या गर्दीतून फिरुन पुन्हा तासाभराने परत मिळायचं. कधी खिशाचा बिल्ला हरवायचा तर कधी डोक्याची टोपी. सकाळी जाताना घातलेला लख्ख गणवेश पार धुळीने माखून जायचा.

घरी येऊन मैदान मारुन आल्याच्या आविर्भावात वडिलांनी आणलेली जिलेबी खायची. जिलेबीचा गोडवा त्या दिवशी औरच असायचा. मग तेव्हा केबल नसताना दुरदर्शन नँशनल वाहिनीवर राजपथावरचं संचलन बघत बसायचं. ते झालं की भगतसिंग, गांधीजी यांचे चित्रपट लागायचे. आमच्या गावचे शहीद लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन केलं जायचं, त्या दिवशी चौकातील मंडळातर्फे धावण्याच्या व संगीतखुर्चीच्या स्पर्धा देखील दुपारी असायच्या. तो दिवस म्हणजे काहीतरी वेगळंच चैतन्य असायचं. स्वातंत्र्य मिळवत शतकांच्या गुलामगिरीतून मुक्ततेचा पहिला क्षण हाच आहे असं वाटायचं. ती आझादीची गाणी कानातून मनात रुजायची. मेरे देश की धरती, आओ बच्चो तुम्हे सिखाये झाँकी हिंंदुस्थान की, है प्रित जहाँ की रीत सदा, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया ही गाणी मी आजही पुन्हा पुन्हा ऐकतो. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षातील ती गेली पंचवीस वर्षे अमृतानुभव! आपल्या देशाप्रति असलेली ती उत्कट भावना आजही अगदी लहान मूल बनवून उत्साहाचे उधाण आणते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान वीरांना व देशाच्या रक्षणासाठी सीमेवर झुंजणाऱ्या शहीद जवानांना विनम्र अभिवादन. देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या व देशभक्तीच्या विचाराने भारावलेल्या प्रत्येक नागरिकास ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनभरुन शुभेच्छा… जय हिंद !


लेखक – तेजस दिलीप सन्मुख

लेखकाचा परिचय- लेखक हे सध्या कायद्याचे अभ्यासक आहेत. ते रसायनशास्त्राचे पदवीधर असून त्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून काम पाहीले आहे. त्यांनी विद्यार्थी चळवळीत विविध पदावर भरीव काम केले असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यरत आहेत.

संपर्क- 9673496139

ई-मेल – tejassanmukh6@gmail.com

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!