Home » How to be stress free? | तरुण वयात एवढे मूड स्वींग का येतात आणि मानसिक आरोग्य कसं जपायचं?

How to be stress free? | तरुण वयात एवढे मूड स्वींग का येतात आणि मानसिक आरोग्य कसं जपायचं?

Reading Time: 3 minutes

तारुण्यात मानसिक स्वास्थ्य कसं जपावं?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

आजचा विषय आहे “आजची तरुण पिढी आणि त्यांचं मानसिक आरोग्य”.

मला असं वाटतं कि या विषयाला जेवढं गंभीर पद्धतीने घ्यायला हवं तेवढं ते घेतलं जात नाही. आणि त्याचमुळे ज्या घडायला नकोत त्या घटना घडतात. सुशांत सिंघ राजपूत हे याचं खूप मोठं उदाहरण आहे!
चला तर तरुणाई डॉट कॉमच्या माध्यमातून ह्या विषयाचा अजून खोलात जाऊन विचार करूयात!

०१) तारुण्य आणि मानसिक स्वास्थ (Teenage and Mental Health) –

किशोर म्हणजे, वय वर्ष १२ ते १९ हा काळ. हा वयोगट जसा मुलांच्या शारीरिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा असतो, तसाच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा! ह्या विशिष्ट काळात जसे मुलांमध्ये शारीरिकदृष्ट्या आमूलाग्र बदल होत असतात तसेच, त्यांच्या मनात भावनिक बदल देखील होत असतात.

०२) मानसिक ताण? (Mental Stress)

किशोरवयीन मुलांमध्ये होणारे हे भावनिक बदल एका मर्यादेपलीकडे गेले की, त्याचा त्रास त्यांना आणि सोबतच त्यांच्या कुटुंबाला देखील होऊ लागतो. आपल्याला काय होतंय? हे त्यांना समजतही नाही आणि धड सांगताही येत नाही.

०३) स्वभाव बदल आणि मानसिक ताण (Mood Swings and Mental Stress)

किशोर वयोगटातील मुलांच्या भावना क्षणाक्षणाला बदलत असतात. कधी आनंद, कधी राग, तर कधी चिडचिडेपणा वाढत जातो. (Mood Swings) मनात उडालेला भावनिक गोंधळ आणि हा गोंधळ निस्तरता न आल्यामुळे तयार होणारी एकटेपणाची भावना! अशावेळी मुलांमध्ये राग, मत्सर, तिरस्कार या भावना प्रकर्षाने दिसू लागतात.

०४) मनातील न्यूनगंड आणि सतत दुसऱ्यांशी केली जाणारी तुलना –

किशोरवयीन मुलांमध्ये भीती, चिंता याचं प्रमाण जास्त असतं. सतत पराभवाची भीती वाटत राहते. आपण दुसऱ्या पेक्षा अधिक चांगले किंवा वाईट आहोत असा न्यूनगंड ते मनात बळावू लागतात. सतत दुसऱ्यांशी तुलना चालू असते.

०५) मानसिक ताणामुळे येणार नैराश्य –

किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक ताणामुळे सतत मनात येणारे नकारात्मक विचार आणि मागोमाग येणारे नैराश्य, वेळीच रोखले गेले नाही तर, होणारे परिणाम गंभीर असतात. अगदी लक्ष वेधून घेण्यासाठी मुल आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही!

०६) नैराश्य आणि त्याचे निदान –

मानसिक ताणामुळे जगात साधारण पाच पैकी एका किशोरवयीन मुलाच्या नैराश्याचं निदान होतं. तर, काही -काही मुलांचं नैराश्य समजायला ०८ ते १० वर्ष जातात. ह्यात निदान न झालेली मुलं सोडूनच द्या!

०७) किशोवयीन मुलांचे नकारात्मक विचार आणि पालकांची जबाबदारी-

किशोरवयीन मुलांचं मानसिक आरोग्य हे नाजूक असतं आणि पालक म्हणून ते तितक्याच संवेदनशीलपणे जपायला हवं. राग येणे, चिडचिडेपणा वाढणे हे किशोरवयीन मुलांमध्ये स्वाभाविक आहे. पण, एखाद्या गोष्टीचा अतिरेक कधीही चांगला नसतो. सारखे येणारे नकारात्मक विचार आणि त्यांच्या होणाऱ्या परिणामांची तीव्रता जर वाढतंच असेल तर वेळीच लक्ष द्यायला हवे.

०८) नैराश्यामध्ये घेता येणारी काळजी –
संवाद महत्त्वाचा-
संवाद नेहमीच सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. किशोवयीन मुलांसोबतचा संवाद वाढवावा. एखादी गोष्ट सांगण्यासाठी मुलांवर जबरदस्ती करू नये. मुलांना त्यांच्या इच्छेनुसार बोलू द्यावे. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत. अशावेळी मुलं चुकांमधून शिकतात हे लक्षात ठेवावे.
चिंतामुक्त वातावरण- 
किशोरवयीन मुलांच मानसिक आरोग्य हे त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवर अवलंबून असतं. अशावेळी घरात खेळीमेळीच वातावरण असणे गरजेचे. घरात शांतता ठेवावी. अगदीच नाही तर, जर घरात सतत वाद विवाद होत असतील तर, त्यावर नियंत्रण कसे आणता येईल हे बघावे.

मुलांच्या मनावरचे दडपण कमी करण्यासाठी:
मुलांशी मैत्री करावी. उगाच सारखं मुलांना ओरडू नये, भीती घालू नये. मुलांची दुसऱ्या मुलांशी तुलना करू नये. अभ्यास, करिअर यांसारख्या गोष्टींसाठी सतत मुलांच्या मागे लागू नये. सर्व गोष्टी त्यांना प्रेमाने समजावून सांगाव्यात. परीक्षेची भीती घालू नये! तसेच, विशिष्ट गुणांसाठी हट्ट धरू नये.

पुरेशी झोप आणि व्यायाम –
किशोरवयीन मुलांना या वयात 8 तास झोपेची आवश्यकता असते आणि ती त्यांना घेवू द्यावी. त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायामाची सवय लावावी. योगा, ध्यान अगदी उत्तम. यामुळे मनावर नियंत्रित ठेवायला मदत होते.
बाल मानसोपचारतज्ज्ञ ची मदत - 
जर पालक म्हणून मुलांना आपण नैराश्य दूर करण्यात मदत करू शकत नसलो किंवा परिस्थिती अगदीच बिकट असली तर, बाल मानसोपचारतज्ज्ञची मदत घ्यायला हवी.
मुलांवरील विश्वास महत्वाचा- मुलांवर विश्वास ठेवावा तसेच, मुलांना काही त्रास होत असेल अशा वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहावे. नेहमी मुलांसाठी backdoor सारखं रहावं.

Backdoor म्हणजे काय?

Backdoor जास्त वापरला जात नसला तरी, आपातकालीन परिस्थितीत त्याचीच आठवण सर्वात आधी येते. तसंच मुलांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाताना काही त्रास झाला, अडचण आली तर, त्या backdoor सारखी त्यांना तुमची आठवण यायला हवी. आईवडील ओरडतील, रागावतील हा विचार मनात येऊन बरेच वेळा मुलं घरी सांगत नाहीत आणि गोष्टी मनात लपवून ठेवतात. तर, अशासाठी backdoor व्हायचं. भलेही काही चांगल्या गोष्टी नाही सांगितल्या मुलांनी तरी अडचणीच्यावेळी निसंकोचपणे तुम्हाला आवाज देतील.

जर हा लेख आवडला असेल तर अवश्य तुमच्या आईवडिलांना, मित्र मैत्रिणींना पाठवा.
अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा.


लेखिका – स्वराली छुरी

स्वराली छुरी

लेखिका Mass Media पदवीधर आहेत

ईमेल – churiswarali@gmail.com

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!