Home » Guru Pournima | गुरुपौर्णिमा का आहे विशेष? जाणून घेण्यासाठी वाचा हा सुंदर लेख!

Guru Pournima | गुरुपौर्णिमा का आहे विशेष? जाणून घेण्यासाठी वाचा हा सुंदर लेख!

Reading Time: 3 minutes

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून ही साजरी करतो. यालाच गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर, महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.

ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना “व्यासांचा मागोवा घेतू” असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत..!

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.

०१) जनक – याज्ञवल्क्य,
०२) शुक्राचार्य – जनक,
०३) कृष्ण, सुदामा – सांदिपनी,
०४) विश्वामित्र – राम, लक्ष्मण,
०५) परशुराम – कर्ण,
०६) द्रोणाचार्य – अर्जुन

अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही!

भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

गुरूपौर्णिमेच्या औचीत्यावर प्रसिद्ध मराठी गायिका आर्या आंबेकर यांनी गायलेले सुंदर श्री गुरु अष्टक ऐका!
( सौजन्य: AaryaSA Official )

अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्ति भावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.

आपल्या भारतीय संस्कृतीत देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोडे अधिक आहे ते, गुरू आणि सद्गुरू यांना.

मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्ये गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते, त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे. ह्या दिवशी शाळेत मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की, त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माचं कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याचे मार्गदर्शन करणारे सद्गुरू. अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून, गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.

खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.

सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहेत. या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्या कडे आहेत.

सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।
इतरांची लेखा कोण करी ॥
किंवा
सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ।
धरावे जे पाय आधी आधी ॥

ही आपल्या मनावर केलेली खोल नोंदणी आहे. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत.

उदा :

व्यास आणि गणेश,
वशिष्ठ आणि राम,
कृष्ण आणि सांदिपनी,
मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव,
जनार्दन स्वामी व एकनाथ.

या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात, एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे, नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे या जरी बाह्य खुणा असल्या तरी, खरी खूण म्हणजे शिष्यांनी गुरूंना केलेले नमन. त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणागती.

असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असतात. त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. याचे उदा. म्हणजे, निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.
गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणागत भाव हवा, कृतज्ञता हवी.

गुरु म्हणजे, ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे, विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे!

गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ ?’ हेच खरे आहे.

महर्षी व्यास ह्यांना जगद्गुरू मानतात. त्यामुळेच काही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात.
गुरूला अनन्य भावे शरण जाणाऱ्या, गुरू महती कळालेल्या, अनुभवलेल्या, प्रत्यय आलेल्या शिष्य मुखातून मग तितकेच विश्वासपूर्ण शब्द बाहेर पडतात आणि ते म्हणजे,

सद्गुरू साईखा असता पाठीसारखा ।
इतरांची लेखा, कोण करी ।

🌼🌼 सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼🌼


लेखिका

आकांक्षा घन

लेखिका कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!