Home » SSC Result 2021 | यंदाचा दहावीच्या निकालात असं काय विशेष आहे?
customer experience, best, excellent-3024488.jpg

SSC Result 2021 | यंदाचा दहावीच्या निकालात असं काय विशेष आहे?

Reading Time: 2 minutes

मित्रांनो, निकाल शब्द ऐकला की काय आठवतं बरं ? अर्थातच निकाल बऱ्याच गोष्टींचा लागतो म्हणा- निवडणुकांचा, शाळांचा इत्यादी. काहीवेळा तर लोक
एकमेकांचा पण निकाल लावायला टपलेले असतात. पण आपण सामान्यपणे बहुतांशी लोकांना सामोरे जाव्या लागलेल्या निकालाबद्दल बोलू तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या
शालेय परीक्षांचा निकाल …

result, exam, a-6015355.jpg

तर निकाल शब्द ऐकला की आठवतं ते म्हणजे तो भितीने पोटात आलेला गोळा, नातेवाईकांचे खणखणणारे फोन, शेजारच्या मंडळींच्या तात्काळ चौकशा, पालकांची त्यांच्या काळातील निकालाची गाथा, कुठे पेढे तर कुठे फटके…

हे सगळं आता आठवताना हसून पुरेवाट होते. पण प्रत्यक्षात तो काळ जगलेल्या आपणाला आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना हा विचार नक्की येतो ना – खरंच एवढे महत्वाचे असायचे का ते निकाल ?
प्रश्न सोपा आहे पण उत्तर तितकंच अवघड. मला आठवतं मला ९०-९५ टक्के मार्क मिळाले तरी वरचे ३-४ कुठं गेले, पहिला आलो तरी गुण अजून पाहीजे होते हे ऐकावं लागायचं. तो दिवस बऱ्याचदा मी चांगले गुण घेऊनही तोंड हिरमुसलं करुन बसायचो, तर माझी बरीचशी मित्रमंडळी ६०-६५ वरही प्रचंड खूष असायची.

तो काळ म्हणजे विद्यार्थ्यांच्या निकालातून निर्माण झालेल्या अवाजवी स्पर्धेचा असायचा. अलिकडच्या काळात निकाल बघितले की विद्यार्थी-शिक्षक-पालक अशा विकास आघाडी ने फार यश मिळवलेले दिसते, बऱ्याचदा ट्यूशन वाल्यांचा बाहेरुन पाठिंबाही असतो. आणि मग हे सरकार जे सुसाट धावत जातं की ते मूळ स्पर्धेच्या धावपट्टीवरुन भलतीकडेच कधी गेलं हे कळतही नाही.

शालेय निकाल हे सुरुवातीपासूनच तुलनात्मक दृष्टीकोनातून बघितले जातात. तुम्हीच आठवून बघा मित्रांनो तुमचे गुण तुमच्या भावंडांशी किंवा शेजारी मित्रांशी
तोलले जायचे ना ? हीच अवास्तव स्पर्धा विद्यार्थी व पालक दोघांनाही गाडीला जुंपते आणि अपेक्षांचं ओझं ओढून जाणं बऱ्याचदा अशक्यही होतं.

प्रत्येक वर्षी निकालाच्या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रकारही ठरलेले असायचे. अतिरिक्त ताण घेऊन भलती पावलं उचलली जायची. यंदाच्या २०२१ च्या
दहावीच्या निकालातून तेवढी गोष्ट सकारात्मक झाली. ९९.९५ टक्के मंडळी सरसकट उच्चगुणांनी पास झाली त्यामुळे तो भलता-सलता विचार यंदा कुणीही केलेला
नसावा. जरी नापास झालंच तरी अजून तिसरी लाट आहेच दिमतीला !

अलिकडच्या काळातील टक्केवारीचा हा फुगलेला आकडा पालकांच्या अपेक्षा उंचावतो पण विद्यार्थ्यांच्या क्षमता त्यामुळे कितपत उंचावल्या गेल्या हा मुद्दा दुर्लक्षित
करुन चालणार नाही. अर्थातच जी परिस्थिती सध्या ओढवली आहे त्यात दुसरे मार्गही सुकर नाहीत.

व्यवस्थेला दोष देणे अथवा उच्चगुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची चेष्टा करणे हे देखील योग्य नाही. यात बरेच प्रज्ञावंतही आहेत हे विसरुन चालणार नाही. पण पर्यायाअभावी सध्या ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षा हाच काय तो मार्ग…

निकाल कसेही लागोत पण विद्यार्थ्यांनी विद्यार्जन हा हेतू विसरता कामा नये. निकाल हे केवळ तुमच्या पाठित ज्ञानाचे मूल्यमापन करतो यशाचे नाही. शालेय
निकालात मागे असणाऱ्या कैक लोकांनी मोठमोठ्या गोष्टींचा निकाल लावलाय. पण अभ्यासाला पर्याय नाही, तो करायलाच हवा.

अंतिमत: दहावीत किती गुण मिळाले यापेक्षा त्या विद्यार्थ्याने जीवनात किती चांगले गुण अंगी बाळगले हे महत्वाचं. परीक्षांतील गुण मिळवण्याप्रमाणेच सद्गुणांचा संचय करणं ही स्पर्धा असावी. खऱ्या अर्थाने तेंव्हा विद्यार्थ्यांना “गुणवंत विद्यार्थी” असे म्हणता येईल.

असो, हा यंदाचा निकाल मात्र मागच्या सर्व निकालांना निकालात काढणारा ठरला हे सांगण्यासाठी वेगळ्या निकालाची गरज नसावी.

तेजस दिलीप सन्मुख
बुधगाव (सांगली)
9673496139

एकवचनी: 1 विचार “SSC Result 2021 | यंदाचा दहावीच्या निकालात असं काय विशेष आहे?”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!